मुंबई - पावसाळा सुरू होण्याआधी राज्य सरकारने हार्डवेअर आणि बांधकाम साहित्याच्या दुकान उघडण्याची मुभा दिली आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज फेक आहे. राज्य सरकारकडून हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल साहित्यांची दुकाने उघडी करण्यास परवानगी नसल्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारोपट्टीला बसला आहे. या वादळात अनेक घरांची पडझड झाली. त्या पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात यावी म्हणून अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असल्याचे या व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही. घरावरचे पत्रे विकणारी दुकाने सुरू आहेत. मात्र, अद्याप हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल साहित्यांची दुकाने उघडी करण्यास परवानगी नसल्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
एक जूनला सकाळी सात वाजता राज्य सरकारने घोषित केलेले लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, त्याआधी राज्यात लॉकडाउन वाढवण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. लॉकडाऊन वाढवण्याबरोबरच राज्य सरकारकडून काही नियमांमध्ये शिथिलता आणण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यापारी वर्गाला दिलासा दिला जाईल. त्यासाठी टास्क फोर्सची चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये कोणतेही बदल केले गेले नसल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असणारे हे मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -whatsapp ban in india व्हॉट्सअॅपचे केंद्राला आव्हान, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका