मुंबई - मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किंमतीत नागरिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन नागरिकांना मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन करीत आहे. शिवाय मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई देखील करीत आहे. त्यामुळे मास्कच्या किमती सामान्यांना परवडणाऱ्या हव्यात. यासाठी घेतलेल्या पुढाकाराला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. हॅण्ड सॅनिटायझर व मास्क यांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सॅनिटायझर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दर निश्चित करण्यापूर्वी उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली. उत्पादक, पुरवठादार व वितरक यांचे उत्पादन क्षेत्र, कार्यालय, गोदाम यांना प्रत्यक्ष भेट दिली. तसेच उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची किंमत लेखा परीक्षक यांच्या सहाय्याने निर्धारित केली आहे. ही अधिकतम विक्री मुल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू राहील.