मुंबई- शहरातील रस्त्यांवर पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यासाठी पालिकेने नव्याने इमारती बांधताना विकासकाने पार्किंगची व्यवस्था करावी, असा नियम केला आहे. असे असताना पश्चिम उपनगरातील एस.व्ही. रोडवर असलेल्या एका इमारतीमधील पार्किंगच्या जागेवर लग्नाचा हॉल चालवला जात असल्याचा प्रकार काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सुधार समितीत निदर्शनास आणला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आझमी यांनी केली आहे.
शहरात केले जाणारे बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी पालिकेने नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याचा नियम केला आहे. त्यानुसार इमारती बांधताना इमारतीच्या तळ मजल्यापासून तीन ते चार मजले पार्किंगसाठी आरक्षित ठेवले जातात. दरम्यान, जोगेश्वरी पश्चिम येथील ई हाईट या इमारतीमध्ये तीन मजले पार्किंगसाठी बांधण्यात आले. या पार्किंगच्या जागेवर विकासकाने लग्नाचे हॉल सुरु केला आहे. त्यामुळे एस.व्ही. रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत पालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली. यावर मार्ग काढू असे पालिका कार्यालयाकडून सांगण्यात येत होते. मात्र, गेल्या तीन वर्षात या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे, आझमी यांनी हा विषय सुधार समितीत निदर्शनास आणला आहे.