मुंबई Marine Aqua Zoo : दादर पश्चिमेत असलेल्या जलतरण तलावात काही दिवसांपूर्वीच मगरीचे पिल्लू आढळले होते. ते मगरीचे पिल्लू मरीन अॅक्वा झू मधील असल्याचं वन्य अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत समोर आलं होतं. याप्रकरणानंतर पुन्हा एकदा मरीन अॅक्वा झू प्राणी चोरीला गेल्यामुळं चर्चेत आलंय. याप्रकरणी मरीन अॅक्वा झू चे ट्रस्टी यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर चोरीला गेलेल्या सर्व प्राण्यांची किंमत चार लाख 55 हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
तक्रारीत काय म्हटलंय : दादर मधील मरीन अॅक्वा झूचे ट्रस्टी पृथ्वीराज पवार यांनी शिवाजी पार्क पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, मरिन अॅक्वा झु प्राणी संग्रालय हे सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत सुरू असते. तसंच मी दररोज दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्राणी संग्रालयात असतो. 31 ऑक्टोबरला सकाळी 9.00 वाजता सोमया विद्याविहार कॅम्पस स्कुल इथं प्राणी प्रदर्शन होतं. म्हणून मी मरिन अॅक्वा झु प्राणी संग्रालय येथुन प्रदर्शनासाठी प्राणी घेवून जाण्यासाठी सकाळी 7.30 वाजता पोहचलो असता तिथं असलेले 6 अजगर, विदेशी प्रजातीचे 2 घोरपड, विदेशी प्रजातींचे पाल, विदेशी प्रजातीची सरडा, विदेशी प्रजातीचे प्राणी त्यांना कंपाउंडमध्ये मिळून आले नाहीत. असं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय.