मारियाचा भाऊ आणि मारियाची आई यांची प्रतिक्रिया मुंबई : परळ परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेला पतीच्या संशयास्पद वृत्तीचा राग आला होता. त्यानंतर पतीच्या छळाला कंटाळून मारिया या तीस वर्षीय शिक्षिकेने 18 मे रोजी कुटुंबासह भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी मारिया आणि तिचा पती आक्रमला बरेच समजावले.मात्र, दोघेही एकमेकांना समजून घ्यायला तयार नव्हते. अखेर पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मारियाचा भाऊ तक्रार फॉर्म टाईप करण्यासाठी जवळच्या न्यायालयात गेला. तेव्हा मारिया तिचा मोबाईल फोन पोलीस स्टेशनच्या लाकडी बाकावर ठेवून गायब झाली. ती आजपर्यंत बेपत्ता आहे. मारियाला पोलिस ठाण्यात बसण्यास सांगण्यात आले होते.
मारिया अद्यापही बेपत्ता :मारिया बेपत्ता झाल्यानंतर भोईवाडा पोलिसांनी पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही तपासले असता ती भोईवाड्यातील शेटे मार्केटमध्ये ५०० मीटर अंतरावर एकटीच चालत असल्याचे आढळले. मात्र, त्यानंतर ती सापडली नाही. भोईवाडा पोलिस उपनिरीक्षक राकेश देवरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आमच्याकडे फिर्याद देण्यासाठी आलेल्या मारियाने अचानक तिचा मोबाईल फोन पोलिस स्टेशनमध्ये सोडून बेपत्ता झाली. तिच्याकडे मोबाईल नसल्याने तिचे लोकेशन ट्रेस करणे आम्हाला अवघड झाले आहे. मात्र, आतापर्यंत तीन मृतदेहांची पडताळणी झाली आहे. पण मारिया सापडली नाही. नुकतेच वरळी येथे एका महिलेचा गोणीत मृतदेह आढळून आला होता. तोही आम्ही तपासला असं देवरे यांनी म्हटलं आहे.
मारियाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय : भोईवाडा पोलिसांनी मारियाचा पती आक्रम खान याला संशय असणाऱ्या मारियाच्या मित्राचीही चौकशी केली आहे. पोलिसांसोबतच मारियाच्या कुटुंबीयांनी तीन महिने शोध घेतला. मात्र, ती सापडलेली नाही. मारियाला पाच भाऊ आणि तीन बहिणी आहेत. जन्मापासून परळमध्ये राहणाऱ्या मारियाच्या भावाचे कोचिंग क्लासेसही परळ परिसरात आहेत. मारियाचा भाऊ अल्तमिश खान, (रा. उत्तर प्रदेश ) बस्ती जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मारिया गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. मात्र, तिचा नवरा अक्रम खान शादी डॉट कॉम दुसरी पत्नी शोधत आहे. त्यांच्या वैवाहिक नियमांनुसार घटस्फोट झालेला नाही. तरीदेखील अक्रम दुसरी पत्नीचा शोध घेत आहे. तसेच मरियमचा भाऊ अल्तमिश याने जनतेला आवाहन केले आहे की, जर कोणी बहिणीला पाहिले असेल तर त्यांनी मुंबई पोलिस किंवा भोईवाडा पोलिसांशी किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधावा. महत्त्वाचे म्हणजे, मारियाचे 2019 मध्ये चेंबूरमधील अक्रम खानसोबत लग्न झाले. मारियाने M.Com आणि MBA पर्यंत शिक्षण घेतले आहे.
विनाकारण पत्नीवर संशय :पतीला मारियाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मारियाचा पती केवळ आरोप करत आहे. तो कोणताही पुरावा सादर करू शकलेला नाही. अक्रम खान स्वतः एका मुलीच्या संपर्कात असल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मारियाने अक्रमशी बोलणे बंद करून व्हॉट्सॲप चॅट बंद केल्यानंतर अक्रमने माफी मागितली. अक्रम खान इंजिनिअर असून विनाकारण पत्नीवर संशय घेत आहेत असे मरिमच्या भावाने म्हटले आहे.