मुंबई MARD Doctors on Strike : मुंबईतील जे जे रुग्णालयातील त्वचा विकार विभागातील निवासी डॉक्टर मागील 10 दिवसांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन करत होते. परंतु, या 10 दिवसांमध्ये त्यांच्या मागण्यांकडं सरकारनं कुठलंही लक्ष दिलेलं नाही, असं म्हणत त्वचा विकार विभागातील डॉक्टरांसह सर्व विभागांतील जवळपास 900 निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी संपकरी डॉक्टरांना पाठिंबा दिला आहे.
त्वचा विभाग प्रमुखांचा मनमारी कारभार : मुंबईतील जे. जे. रुग्णातील त्वचा विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा मार्ड संघटनेचा आरोप आहे. डॉ. कुरा यांच्याबाबत त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांनी मागील अनेक दिवसांपासून तक्रारी दिल्या होत्या. याबाबत तक्रार करुन 19 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्वचा विभागातील सर्व निवासी डॉक्टर मागील 10 दिवसांपासून याबाबत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची कुठलीही दखल सरकारनं घेतलेली नाही. तसंच याबाबत त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीची चर्चा झालेली नाही. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत जवळपास 900 निवासी डॉक्टर आजपासून आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं मार्डकडून सांगण्यात आलंय.
मागील अनेक दिवसांपासून आम्ही रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय शिक्षण संचालक, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना आमच्या मागणी संदर्भात पत्र देऊन संपावर जाण्याचा इशारा दिला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांबरोबर आमची भेट झाली. तरीसुद्धा आतापर्यंत त्वचा विकार विभागातील निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्वचा विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांची तक्रार करून 20 दिवस झाले. तरी त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्यानं अखेर आजपासून आम्ही संपावर जाण्याचा इशारा दिलाय. - डॉ. शुभम सोहनी, अध्यक्ष, जे जे निवासी डॉक्टर संघटना
त्वचा विभागाच्या प्रमुखांबरोबर जवळीक : त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्याविरोधात तक्रार असलेले पदव्युत्तर शिक्षण घेतलेले 21 निवासी डॉक्टर हे 18 डिसेंबरपासून सामूहिक रजेवर गेलेले आहेत. त्याचप्रकारे प्रशासनाकडून या डॉक्टरांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीकडूनही अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसंच यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीतील काही डॉक्टरांची त्वचा विभागाच्या प्रमुखांबरोबर जवळीक असल्याचंही निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. या सर्व कारणास्तव जे. जे. मधील त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांनी मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचीसुद्धा भेट घेतली. परंतु, या भेटीनंतरही परिस्थिती चिघळली आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याचं समोर आल्यानं जे. जे. मार्ड संघटनेनं सर्व विभागातील निवासी डॉक्टरांकडून आता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करत असल्याचं सांगितलंय. त्वचा विभाग प्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा :
- J J Hospital जे जे रुग्णालयात सापडलेल्या भुयारामागे काय आहे रहस्य, अधिष्ठाता डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
- JJ Hospital Strike: २५ वर्ष सुरू असलेल्या हुकुमशाहीचा अंत... संप मागे घेताना जेजेमधील मार्डच्या डॉक्टरांची संतप्त प्रतिक्रिया