मुंबई :मराठवाड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून विरोधकांनी राज्यसरकारवर टीकेची झोड उठवलीय. सरकारनं केलेल्या वारेमाप खर्चाचा देखील विरोधकांनी समाचार घेतलाय. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तब्बल सात वर्षांनंतर ही बैठक होत असल्यानं याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. या बैठकीच्या निमित्तानं राज्य सरकारचे सर्व 29 मंत्री, 400 अधिकाऱ्यांचा ताफा संभाजीनगर (औरंगाबाद) दाखल झाला होता. या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती. तिथंच त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली असून मंत्र्यांच्या जेवणाच्या हजारे रुपय खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरकारनं केली जनतेच्या पैशांची उधळपट्टी :रविवारी मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पार पडली. यावेळी राज्य सरकारनं जनतेच्या पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधी पक्षानं केलाय. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यसरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नसून केवळ तीन लोकांचं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
हैदराबादहून कोल्ड कॉफी मागवली : 'युवराज आदित्य ठाकरे' मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना कोल्ड कॉफी, बर्गर हवं होतं. त्यामुळं हैदराबादहून कोल्ड कॉफी, बर्गर आणावं लागलं, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केलाय. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहात होते. मात्र इंडिया आघाडीची बैठक कुठे होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. खासदार संजय राऊत आता पत्रकारिता विसरून पवारांच्या ताटाखालचं मांजर बनल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. त्यांना पत्रकार म्हणून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावलाय. संजय राऊत यांच्या पत्रकारितेनं आनंद दिघेंना टाडा लागला होता अशी आठवण देखील नरेश म्हस्के यांनी करून दिली.