मुंबई Marathi Signboards Mumbai : दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं (SC on Marathi Signboards) दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली, तरी मुंबई महापालिकेनं सुट्टीच्या कारणास्तव २ दिवसाचा अधिक अवधी दिल्यानंतर आता मंगळवारपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. या विषयावर मनसेही बुधवारी (MNS on Marathi Signboards) पत्रकार परिषद घेणार आहे.
महापालिका ॲक्शन मोडमध्ये : सर्वोच्च न्यायालयानं दुकानं व आस्थानपनांवर मराठी भाषेत नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर नियमाचं पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मराठी पाट्यांबाबत पालिका आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबईतील कुलाबा मार्केटमध्ये पालिका अधिकाऱयांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या सर्व २४ वॉर्डमध्ये ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहेत.
९० टक्के आस्थापनांनी नियम पाळला : मंगळवारी कुलाबा येथे केलेल्या कारवाईत ६० ते ७० आस्थापने, दुकानांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत अंदाजे ५ लाख आस्थापने असून त्यात दुकाने, कार्यालये, हॉटेल, दवाखाने या सर्वांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतील अंदाजे ९० टक्के आस्थापनांनी मराठी नामफलक लावले असून, १० टक्के आस्थापनांनी देवनागरीत फलक लावलेले नाहीत. विशेष म्हणजे अमराठी भागात मराठीत फलक न लावण्याचं प्रमाण जास्त आहे.