मुंबईMarathi signboards News - मुंबईत मराठीत पाट्या नसणाऱ्या दुकानांवर आजपासून मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. मराठीत फलक न लावणाऱ्या दुकानदारांना मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यात आलेल्या आहेत. ज्या दुकानदारांनी मुदत वाढवून देऊनही मराठीत फलक लावलेले नाहीत, अशा दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेची टीमदेखील सज्ज झाली आहे.
कारवाईचे स्वरुप कसे असणार?आजपासून दुकानांवरील मराठी पाट्या आहेत की नाही, याची शहानिशा करण्यासाठी मुंबईत 24 प्रभागांमध्ये स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. पालिकेच्या इशाऱ्यानंतर 23 हजारहून अधिक दुकानदारांनी मराठी भाषेत फलक लावले आहेत. तर याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुमारे 5 हजार 217 दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहेत. आजपासून ज्या दुकानावर मराठीत फलक दिसला नाही, त्याचा आर्थिक दंड दुकानदारांना सोसावा लागणार आहे. मराठी पाटी लावली नाही तर तर प्रति कर्मचारी 2 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. उदाहरणार्थ एका दुकानात 10 कर्मचारी काम करत असतील आणि त्या दुकानावर मराठीत फलक नसेल, तर त्या दुकानदाराला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
मुंबईत 7 लाखांहून अधिक दुकाने...मुंबईत 7 लाखांहून अधिक दुकाने, हॉटेल आणि इतर आस्थापना आहेत. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान व आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. पंरतु मुंबईत अनेक दुकानांवर मराठीत फलक नसल्यामुळं याबाबत मनसेनंसुद्धा आंदोलन केले होते. दरम्यान, आजपासून पालिकेची टीम दुकानांना भेट देऊन, दुकानांवर मराठीत फलक आहे की, नाही याची तपासणी करणार आहे. जिथे मराठी भाषेत लिहिलेले फलक नाही, त्या दुकानदारांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.