महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापुरात नुकसान झालेल्या चिपळूणच्या ग्रंथालयाला पुस्तकांची मदत रवाना

महापूरात नुकसान झालेल्या चिपळूनमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, वाचनालयाला मराठी भाषा विभागाच्या वतीने अडीच हजार पुस्तके देण्यात आली.

Marathi Language Department send 2500 Books for chiplun lokmanya tilak smarak vachan mandir
महापुरात नुकसान झालेल्या चिपळूणच्या ग्रंथालयाला पुस्तकांची मदत रवाना

By

Published : Aug 26, 2021, 8:32 PM IST

मुंबई -अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहरात महापुराचे पाणी शिरल्याने सन १८६४ साली स्थापन झालेल्या व १५७ वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, वाचनालयात वर्षानुवर्षे जोपासलेल्या अमुल्य अशा ग्रंथ संपदेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वाचनालयातील पुस्तकांचे नुकसान विचारात घेऊन वाचन संस्कृती वातावरण परत पूर्वपदावर यावे यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने अडीच हजार पुस्तके देण्यात आली.

चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आहे. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा विभागाशी निगडित सर्व संस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच त्यांनी भेट देण्यात येणाऱ्या ग्रंथसंपदेची माहिती घेतली.

अनेक वर्षाची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावी, वाचकांना पुन्हा पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत आणि वाचन संस्कृती अखंडीतपणे प्रवाहीत राहावी, या हेतूने वाचनालयाला राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक अशी अडीच हजार पुस्तके भेट देण्यात आली आहेत.

हेही वाचा -गृहमंत्री अमित शाह यांचा नारायण राणे यांना फोन, घटनेचा तपशील मागवला
हेही वाचा -राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ऑनड्युटी मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरी

ABOUT THE AUTHOR

...view details