मुंबई :Mahesh Jadhav beating : माथाडी कामगार सेनेचे महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आता मनसेमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. यानंतर तत्काळ, मनसेकडून या घटनेची दखल घेण्यात आली असून, बाळा नांदगावकर यांच्या सहीने एक्स (ट्विटरवर) एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामध्ये मराठी कामगार सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं जाहीर केलंय.
नेमक काय घडलं? महेश जाधव यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलय, 'मी 800 माथाडी कामगारांचा प्रश्न सोडवत होतो. मात्र, हे कामगार ज्या बिल्डरसाठी काम करत होते, त्या बिल्डरचे आणि अमित ठाकरे यांचे संबंध आहेत. या बिल्डरसोबत अमित ठाकरे यांनी मला सेटलमेंट करायला सांगितली. मी या कामगारांसोबतच राहणार अशी भूमिका घेतल्याने, अमित ठाकरे यांनी त्यांच्या बिल्डर मित्रांच्या मदतीने मला राजगड या पक्ष कार्यालयात बोलावून घेतलं आणि मारहाण केली असा आरोप केलाय. जाधव बोलत असताना त्यांच्या तोंडात आणि डोक्यावरून कपाळावर रक्ताचे ओघळ आलेत असं दिसतय.
राज ठाकरे आणि अमित ठाकरे जबाबदार : यामध्ये जाधव म्हणालेत, उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर त्याला पूर्णपणे राज ठाकरे, अमित ठाकरे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेना जबाबदार असेल. तसंच, मी या माथाडी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज ठाकरे, अमित ठाकरे आणि त्यांचा पक्ष फक्त खंडणी गोळा करण्याचं काम करतो असा थेट आरोपही जाधव यांनी केलाय. राज ठाकरे फक्त भाषणांमधून आपण मराठी माणसाच्या बाजूने उभा असल्याचा आव आणतात. पण प्रत्यक्षात मात्र, मराठी माणसाच्या नावाने खंडणी गोळा करतात, असा गंभीर आरोप जाधव यांनी केलाय.
मराठी कामगार सेनेची हकालपट्टी :महेश जाधव यांच्या फेसबुक लाईव्हनंतर राज ठाकरे यांच्या आदेशाने मराठी कामगार सेना आणि महेश जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली. मराठी कामगार सेनेची मनसेतून हकालपट्टरी करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या संदर्भातील अधिकृत पत्रक महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून जाहीर करण्यात आलं असून, यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची स्वाक्षरी आहे.