मुंबई- ठाण्यातील अमराठी रिक्षा चालक उद्या जर अस्सलिखित मराठीतून बोलू लागला तर आश्चर्य वाटायला नको. कारण मराठी बोलण्याची अशी किमया मुंबई विद्यापीठातील जर्मन विभाग करणार आहे. यासाठी लवकरच मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात रिक्षा चालकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत.
रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका ही मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. विभा सुराणा यांनी बजावली आहे. त्या माय मराठीच्या 'भाषा दूत' बनल्या आहेत. स्वतः अमराठी असतानाही आपल्या जर्मन विभागाच्या माध्यमातून त्या मुंबईतील मराठी रिक्षाचालकांना मराठीचे धडे देणार आहेत. यासाठीचा जर्मन पद्धतीने आणि अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासक्रम त्यांनी तयार केला असून लवकरच त्याची सुरुवात मुंबईत होणार आहे.
डॉ. सुराणा या स्वतः अमराठी असूनही जर्मन, इंग्रजी, हिंदीसह मराठी भाषेवर ही प्रभुत्व मिळवले आहे. मराठीत तज्ञांना लाजवेल अशा प्रकारचा एक लघु अभ्यासक्रम त्यांनी मुंबईतील अमराठी रिक्षा चालकांसाठी तयार केला आहे. यासाठीची अनेक पुस्तके तयार झाले आहेत. इतकेच नव्हे तर एक अँड्रॉइड ऐप ही त्यांनी तयार केला आहे. लवकरच मुंबईतील रिक्षा चालकांना आम्ही जर्मन विभागाच्या माध्यमातून मराठीचे धडे देणार असल्याची माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.