महाराष्ट्र

maharashtra

महाराष्ट्र दिन विशेष : मराठी भाषा भवनापासून 'राजधानी' अजूनही पोरकीच, ईटीव्हीचा विशेष रिपोर्ट

By

Published : May 1, 2019, 7:02 AM IST

मुंबईत मराठी भाषा भवन उभे करण्यासाठी मागील साडेचार वर्षांपासून अनेकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवाय विनोद तावडे यांनी यासंबंधीत घोषणाही केल्यात. मुंबईत मराठी भाषा भवन उभे करण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, त्यावर आत्तापर्यंत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

राज्य मराठी विकास संस्था

मुंबई- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला गेल्या साडेचार वर्षात मुंबईत मराठी भाषा भवन उभे करता आले नाही. यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या. निर्णय झाले आणि घोषणांचा मोठा गाजावाजाही झाला. मात्र, राजधानी ही मराठी भाषा भवनापासून अजूनही पोरकीच राहिली आहे. सरकारला मुंबईत मराठी भाषा भवन उभे करता आले नाही. मात्र, नवी मुंबईतील ऐरोली येथे केवळ उपकेंद्र उभे करण्यासाठी मागील वर्षभरापासून कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, ते कधी पूर्ण होईल याविषयीही विभागातील अधिकारी सांशक असल्याचे दिसून आले.

मराठी भाषा भवानाबाबत सरकारवर टीका करताना मराठी भाषा अभ्यासक दीपक पवार

मराठी भाषेच्या विकासासाठी राज्यात विविध ठिकाणी असलेली मराठी भाषा विकासासंदर्भातील कार्यालये एकाच छत्रछायेखाली आणण्याची ही संकल्पना मागील सरकारच्या काळात समोर आणली होती. या भवनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती महामंडळ, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विकास संस्था या ४ संस्थांचा कारभार एकाच ठिकाणी आणला जाणार होता. त्यासाठीच मुंबईत मराठी भाषा भवन उभे करण्यासाठी मागील साडेचार वर्षांपासून अनेकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवाय विनोद तावडे यांनी यासंबंधीत घोषणाही केल्यात. मुंबईत मराठी भाषा भवन उभे करण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, त्यावर आत्तापर्यंत अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

मुंबई ऐवजी नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर-१३ मध्ये २ हजार चौरस फुटाच्या जागेवर एक उपकेंद्र उभे केले जाणार आहे. त्यासाठी गेल्यावर्षी जीआर काढण्यात आला. मात्र, अजनूही हे उपकेंद्र उभे राहिलेले नाही. यामधून मराठी भाषा विकास आणि त्यासाठीची सरकारची उदासिनता समोर आली आहे.

मराठी भाषा भवन उभे करण्यासाठी सुरुवातीला मुंबईतील कामा रूग्णालयाच्या मागे असलेल्या रंगभवनच्या खुल्या नाट्यगृहाच्या जागेची निवड करण्यात आली होती. त्यासाठी सरकारने जागाही वितरीत केली होती. मात्र, याला मुंबई महापालिकेने खो घातला. त्यासाठी पुरातन वास्तू असल्याचा दावा महापालिकेने पुढे करत येथे दुसरे कोणते बांधकाम करण्यास परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर येथील प्रस्ताव मागे पडला. मार्च २०१८ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने एक निर्णय घेऊन मराठी भाषा भवन हे वांद्रा-कुर्ला संकुलात उभे करण्याचे ठरले होते. मात्र, तोही प्रस्ताव रद्द झाला. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत मराठीच्या नावाने वेळोवेळी राजकारण करणाऱ्या सरकारला मुंबईत एक मराठी भाषा भवन उभे करता आले नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

मराठी भाषा भवन नसणे म्हणजे भाषेचा अपमान - दीपक पवार
मराठी भाषा भवन हे मंत्रालय आणि त्याच्या जवळपास असायला पाहिजे. गेल्या १० वर्षांपासून त्यासाठीचे प्रस्ताव येतात. मात्र, त्यावर योग्य असा निर्णय होत नाही. आता ते कुठे तरी उपकेंद्र हे ऐरोलीसारख्या ठिकाणी उभे केले जाणार आहे. मात्र, यासारखा भाषेचा दुसरा कुठला अपमान असेल, असे वाटत नसल्याचे मराठी भाषा अभ्यासक दीपक पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details