मुंबई- कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या पुरानंतर आता राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात मराठी कलाकारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही आवर्जून पुढाकार घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
मदत कार्याबाबत माहिती देताना दिग्दर्शक विजू माने मराठी कलाकारांच्या या आवाहनाला पाठींबा देण्यासाठी अनेक हात पुढे आले आहे. मुंबईत यशवंत नाट्यमंदीर, ठाण्याचे गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, अशा काही ठिकाणांहून मदत जमा व्हायला सुरुवात झाली आहे. स्वतः अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेता अभिजित चव्हाण, दिग्दर्शक विजू माने आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी ही मदत एकत्र करून ती कोल्हापूर आणि सांगलीकडे पाठवण्याची तयारी सूरु केली आहे.
मोठया प्रमाणावर गव्हाचे पीठ, औषधे, तेल, मीठ, बिस्कीटे, आदी जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था झाली आहे. त्याचबरोबर, मॉस्किटो कॉईल, डांबर गोळ्या, फिनाईल या गोष्टी देण्याची विनंती या कलाकारांकडून करण्यात आली आहे. एवढेच नाही तर शक्य तेवढी औषधी जमा करण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी ठाण्यात एक ट्रक भरेल एवढे समान जमले असून, अजून तीन दिवस जमेल तेवढ समान जमा करण्याचे या कलाकारांनी ठरवले आहे.
रस्ता मार्ग खुला झाल्यावर लवकरात लवकर हे समान गरजू व्यक्तींपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक विजू माने यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी स्थानिक मदत आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, सामान घेऊन ते गरजू पुरग्रस्तांपर्यंत पोहचवणार असल्याचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी स्पष्ट कले आहे.