मुंबई - कोरोनामुळे रखडलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला महाविकास आघाडी सरकारने तत्वत: मान्यता दिली. या योजनेमुळे औरंगाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याला पिण्याचे शाश्वत पाणी मिळेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. तसेच, मंत्रिमंडळात याबाबत चर्चा होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याला अंतिम मंजुरी देतील, असेही देशमुख म्हणाले. व्हेटिलेटर, म्युकरमायकोसिस औषधांचा तुटवडा आणि सिने कलावंताना भेडसावणाऱ्या समस्येवरही देशमुख यांनी भाष्य केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
माहिती देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हेही वाचा -एसटीची 'महाकार्गो सुसाट, १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार
लवकरच स्वप्न पूर्ण होईल
मराठवाड्यातील हे जिल्हे कायम दुष्काळी आहे. या भागाला कायमस्वरुपी पिण्याचे पाणी देणे ही महाविकास आघाडीची भूमिका राहिली आहे. आज हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. त्याचे समाधान असल्याची भावना देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच, मराठवाड्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. त्यासाठी सुरुवातीपासून राज्य सरकार कामाला लागले. परंतु, कोरोना संकटामुळे वॉटर ग्रीडचा प्रकल्प रखडला होता, त्यामुळे काहींनी योजना गुंडाळली, असे आरोप केले. मात्र, योजना गुंडाळणे किंवा ती रद्द करणे, अशी कधीही चर्चा झाली नाही, असे देशमुख म्हणाले.
सरकार कलावंताच्या पाठीशी
कोरोनामुळे सिनेक्षेत्र संकटात आहे, याची जाणीव आहे. जेष्ठ कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान वितरीत केले आहे. त्यांची काळजीही घेतली जात आहे. कोरोना संकटामुळे चित्रपट, मालिकांवर निर्बंध आले आहेत. अनेक संघटनांसोबत याबाबत बैठका झाल्या. दरम्यान, कलावंताचे जे नुकसान होत आहे, त्यांना मदत देण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. येणाऱ्या काळात सरकार निर्णय घेईल, असेही सांस्कृतीक मंत्री देशमुख म्हणाले. कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. अशात हे असे क्षेत्र आहे की, कोरोनाचे नियम पाळणे कठीण आहे. मात्र, स्ट्रेनचा संसर्ग कमी झाल्यास केंद्र, राज्य सरकार आणि टास्क फोर्सच्या नियमानुसार चित्रीकरणाला परवानगी दिली जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. सिनेक्षेत्राचे नुकसान होत आहे, याची जाणीव आहे. कलावंतांनी परिस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी केले. तसेच, लसीकरण झाल्यास सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे ते म्हणाले.
जून महिन्यात परिक्षा
वैद्यकीय क्षेत्राच्या परिक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या. त्या आता १० जून ते ३० जून २०२१ या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणाले.
व्हेंटिलेटर खराब
केंद्राकडून मिळालेले काही व्हेंटिलेटर खराब होते. किमान आठशे ते नऊशे व्हेंटिलेटर खराब मिळाले होते. डॉक्टरांच्या सूचनांनुसार ही बाब राज्याने केंद्राला कळवली. आता खराब व्हेंटिलेटर पुरवठादार कंपन्यानी बदलून द्यावेत, अशी मागणी आहे. म्युकरमायकोसिसबाबतही राज्य शासनाने तयारी केली आहे. सरकारी, खासगी रुग्णालयात औषधे उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. भारत सरकारने म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन देणार असल्याचे म्हटले आहे. जसे इंजेक्शन येतील, तसे नियोजन करणार असल्याचे मंत्री देशमुख म्हणाले.
हेही वाचा -..तर म्यूकरमायकोसिस होणारच नाही! टास्क फोर्सने रुग्ण, डॉक्टरांना दिल्ला सल्ला