नवी मुंबई:मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगारांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सर्व कामगार आज लाक्षणिक संपावर गेले आहेत. डॉक्टरांकडून तपासणी करण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला. दोन दिवस पाणी घेतले नाही.
Live updates:
- मनोज जरांगे पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी जाणूनबुजून मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला संशय आहे. त्यांनी विषय न घेतल्यानं मराठ्यांना फरक पडत नाही. मात्र, ते विषय विचारात घेतली अशी अपेक्षा होती. त्यांच्याबाबत मराठ्यांना काही वाईट भावना नव्हती. मराठ्यांची पंतप्रधानांबद्दल वाईट भावना असती, तर त्यांचे विमानदेखील शिर्डीत उतरू दिले नसते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींना सांगितले नाही का? पंतप्रधानांना गोरगरिबांची गरज राहिलेली नाही. वेळ देऊनही यांनी मराठा आरक्षण दिलेले नाही. मराठ्यांची पोरं मोठे होऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी व राज्य सरकारनं षडयंत्र रचल्याचा मराठा बांधवांचा संशय आहे. हे षडयंत्र खोटे असते तर त्यांनी आरक्षण दिले असते, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
- पुढे जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही वेळ घेऊनही आरक्षण दिले नाही, ही बाब तुमच्या अंगलट आली आहे. सरकारला आता नाक असल्यासारखं झाले आहे. तुम्ही मागाल ते मराठ्यांनी पुरावे दिले. तुम्हाला आमच्या खासगी अभ्यासकांनी दहा हजार पुरावे दिले आहेत. १८०५ ते १९६७ चे पुरावे दिले आहेत. समितीनं तपासलेल्या कागदपत्रात काय आहे, हे तुम्ही सांगितलं नाही. १० हजार पानांचे पुरावे असूनही मराठा आरक्षणही दिलं नाही. बॉम्बे गॅझेटमध्ये मराठा व कुणबी एक असल्याचे पुरावे दिले आहेत. मराठ्यांच्या मुलाचं भले होऊ नये, यासाठी मोठे षडयंत्र आहे. पुढील तीन ते चार दिवस तुमची झोप उडणार आहे.
- ओबीसी बांधवांचा आमचा एकच व्यवसाय आहे. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत. बाकीच्यांना पुरावे देऊन आरक्षण दिले नाही. तुम्ही आरक्षण कसे देत नाही, हे आता बघणार नाही. विदर्भात पंजाबराव देशमुख यांनी दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे मराठा आरक्षण देऊ शकता. मराठ्यांकडून बाँड पेपर घेऊनही मराठा आरक्षण देता येते. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून षडयंत्र सुरू असल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला. आता, आम्हाला नेमून दिलेली समितीही मान्य नाही. आमची फसणूक करण्यासाठी समितीची वेळ वाढवून घेतली आहे.