मुंबई:जालनामधील आंदोलकांवर लाठीचार्जकरण्याचा निर्णय हा मंत्री पातळीवर घेण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मात्र जर असे सिद्ध झाले तर आपण राजकारण सोडू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलय. आमच्या तिघांपैकी कोणीही लाठीचार्जचा आदेश दिला नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठासून सांगितले. मात्र जर आम्ही आदेश दिला नसल्याचे सिद्ध झाले तर आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं, असे आव्हानही पवार यांनी विरोधकांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार जे करावे लागेल ते करणारच आहोत. सरकार या प्रश्नाबाबत गंभीर आहे. त्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्याच्या सूचना आयोगाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जांरंगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे मराठा समाजाला जे आरक्षण अपेक्षित आहे, ते आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे.मराठा समाजानं याबद्दल निश्चिंतराहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
टास्क फोर्सच्या माध्यमातून सोडवणूक-मराठी समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या टास्क फोर्सला मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयात आरक्षण टिकावे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्यानं काम करत आहे. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलती मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे जातप्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचं त्यांनी सांगितले.