मुंबई :मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळल्यानं राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी करण्यात अपयशी ठरल्यानं हात हालवत परत गेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणावर खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची बैठक :मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं शिष्टमंडळ रिकाम्या हातानं परतलं. या शिष्टमंडळातील सदस्य असलेले अर्जुन खोतकर यांनी चर्चेची दारं अद्याप खुली असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजही मराठा आंदोलकांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र शिष्टमंडळ रिकाम्या हातानं परतल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंगळवारी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीत मराठा आंदोलनावर खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.