मुंबई : Maratha Reservation Protest : जालना येथे मराठा आंदोलकांवर शुक्रवारी (१ सप्टेंबर) पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक आंदोलक आणि पोलीस अधिकारी जखमी झाले होते. आता याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी एसटी बस जाळण्यात आल्यात. तर, काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली. याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला (MSRTC ST Bus) बसलाय.
एसटीचं नुकसान किती? : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करण्यात येतंय. यात आंदोलक एसटी बसची जाळपोळ करण्यात असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 250 पैकी किमान 46 बस डेपो पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळं एसटीचं गेल्या काही दिवसात 13.25 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांतील एसटी डेपोला याचा मोठा फटका बसलाय. आंदोलनात एकूण 20 बसेस जाळण्यात आल्या, तर 19 बसेसची तोडफोड करण्यात आली.
आंदोलनांमुळे तिकीट विक्रीत 8 कोटींचं नुकसान : राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या आंदोलनांमुळे एसटीचं नुकसान झालं आहे. बसेसच्या तोडफोडीमुळं एसटीचं 5.25 कोटी रुपयांचं नुकसान झालं. तर तिकीट विक्रीत 8 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. MSRTC ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था आहे. एसटीच्या ताफ्यात 15 हजार पेक्षा जास्त बस आहेत. एसटी बसनं दररोज सुमारे 60 लाख प्रवासी प्रवास करतात.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न : सध्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. तसेच 6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती, 7 सप्टेंबर रोजी गोपाळकाला, 14 सप्टेंबर रोजी पोळा सण व 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. या सण, उत्सवांच्या अनुषंगानं मिरवणुका व इतर कार्यक्रम होणार आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्टया सत्ताधारी व विरोधकांत एकमेकांविरुद्ध विविध कारणांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघटनांकडून उपोषण, धरणे, मोर्चे, निर्दशने रास्तारोको, या प्रकारचे आंदोलन केले जात आहेत.
हेही वाचा -
- Maratha Reservation : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळणार? हैदराबादच्या निजामांचं रेकॉर्ड तपासणार
- Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर, संभाजीनगरमध्ये युवकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
- Maratha Morcha Baramati: अजित पवारांचा पेच आणखीनच वाढला; सरकारमधून बाहेर पडण्याचं बारामतीकरांचं आवाहन