मुंबई -मराठा आरक्षणाकरिता सुरू असलेल्या उग्र आंदोलनाची झळ आता सत्ताधारी आमदारांना बसत आहे. अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांनी फोडली आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे आंदोलक छत्रपती संभाजीनगरमधून आल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही दिसू लागले आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींच्या हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड करत काचा फोडल्या आहेत. आकाशवाणी आमदार निवास इथं उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. आकाशवाणी आमदार निवासाखाली पोलिसांचा बंदोबस्त नेहमीच असतो. मात्र आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा बंदोबस्त आणखीनं वाढवण्यात आला. पोलिसांनी हसन मुश्रीफ यांची गाडी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथं नेली आहे.
मराठा समाज्याच्या आंदोलनाला गालबोट लागत आहे. जाळपोळ आणि तोडफोडमुळे मराठा समाजच्या आंदोलनाची सहानुभूती कमी होत आहे. मला सुरक्षा व बंदोबस्त गरज नाही. माझी गाडी फोडणाऱ्यांना सोडून द्या. त्यांच्यावर कठोर कारवाई नको. विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षण देऊन टाकावे, म्हणजे आपले काम पूर्ण होईल- वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
- वैजापूरहून हे तीन आरोपी आले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अजय साळुंखे, संतोष निकम आणि दिपक सहानखुरे अशी तीन आरोपींची नावे आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.