मुंबई Maratha Reservation Issue :मराठा आरक्षण प्रश्न आणि आंदोलन राज्यभरात अतिशय आक्रमक आणि उग्र होत आहे. आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं असलं तरी आंदोलन हे टोकदार झालं आहे. त्यामुळे सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेऊन राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचा निर्णय घेतला आहे. (Sanjay Shirsat)
जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ :जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी आतापर्यंत आपण कोणालाही भेटणार नाही. केवळ मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा लिफाफा घेऊन या, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे सरकारच्या वतीनं कोणीही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. कारण सरकार टिकणारं आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी आपल्याला कोणीही भेटत नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीनं सहा जणांचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी रवाना झालं आहे. धनंजय मुंडे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे या मंत्र्यांचा यात समावेश आहे. तर आमदार नारायण कुचे आणि आरोग्य सेलचे प्रमुख मंगेश दिवटे हे भेटीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या शिष्टमंडळानं केलेल्या विनंतीला जरांगे पाटील निश्चित मान देतील आणि ते आपलं उपोषण मागे घेतील. ते सरकारला वेळ देतील अशी अपेक्षा आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.