मुंबई: जालना जिल्ह्यात २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. रात्री एक वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
सरकारची आंदोलन मागं घेण्याची विनंती : या भेटीदरम्यान शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. बैठकीत, जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं, अशी विनंती सरकारनं शिष्टमंडळाकडं केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 'मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली. हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी जाऊन चर्चा करेल. आम्हाला आशा आहे की यातून मार्ग सापडेल', असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित : बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'X' वर पोस्ट करत बैठकीबद्दल माहिती दिली. 'मराठा समाजासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती यावेळी देण्यात आली. तसेच पुढील कार्यवाहीसंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा झाली', असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
'हे' नेते बैठकीला उपस्थित होते : शिष्टमंडळाच्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, प्रविण दरेकर, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव उपस्थित होते.
हेही वाचा :
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी वकिलाचा आत्महदनाचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ
- Sambhaji Raje on Maratha Reservation: ...अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही फसवणूक -संभाजी राजे यांची सरकारवर टीका
- Bhandara Scattered On Vikhe Patil : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळ्यानं गोंधळ, नेमकं काय घडलं?