मुंबई Maratha Protest:मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यात आंदोलनं, निदर्शनं केली जात आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला गालबोट देखील लागलं आहे. पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. (meeting of all party MLAs) नकळतच आमदारांवरती मराठा समाजाचं आरक्षणावरून दबाव वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतयं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी 22 आमदारांनी आज मंत्रालयाच्या मुख्य द्वाराला टाळं ठोकलं. (demonstrations on steps of Vidhan Bhavan) तब्बल तीन तास मंत्रालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप असल्याने मंत्रालय प्रशासनाची भंबेरी उडाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, 'एक मराठा लाख मराठा' अशा प्रकारच्या घोषणा आमदारांकडून देण्यात आल्या. विशेष अधिवेशन संदर्भात मुख्यमंत्री स्वतःहून ते जाहीर करत नाही तोपर्यंत आपण पायऱ्यांवरून उठणार नाही अशा प्रकारचा पवित्रा आमदारांनी घेतला होता. सरकारच्या वतीने मंत्री संजय बनसोडे आणि मंत्री अनिल पाटील यांनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते निष्फळ ठरले. त्यानंतर पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या आमदारांना ताब्यात घेतलं.
विधानभवनातही आमदारांकडून निदर्शनं:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि ठाकरे गटाचे आमदार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केलीय. शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, नेते जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, नरेंद्र दराडे उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आणि शरद पवार गटाच्या आमदारांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी केली.
अजित पवार गटाने सांभाळून राहावं:मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलताहेत की, त्यांच्यासोबत दगा फटका होऊ शकतो हे अगदी बरोबर असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यांना ज्या पद्धतीनं दगा फटका केला आहे तशाच प्रकारे सगळ्यांसोबत केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्य शासनानं मराठा समाज, लिंगायत समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज सर्वांना धोका दिला असल्याचा खळबळजनक आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कोण सुरक्षित आहे या राज्यामध्ये? याला पूर्णपणे जबाबदार राज्याचे गृहमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री सातत्याने ते खोटं बोलत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.