मुंबई -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादीसह राज्यातील विविध सामाजित संघटनाकडून निदर्शने व्यक्त करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चाकडूनही ई़डीच्या या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. शरद पवारांनी सध्या प्रचार सभांच्या माध्यमातून सरकारविरोधात रान उठवले आहे. त्यामुळेच ही कारवाई केली असल्याची चर्चा आता सुरू आहे.
हे ही वाचा - माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार
वयाच्या ८०व्या वर्षीही पक्षातील सगळे सहकारी सोडून जात असताना, न डगमगता संपूर्ण राज्यभर दौरे काढत जनतेत जाऊन मिसळत आहेत. त्यांच्या या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच सरकारकडून महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यावर ही कारवाई करण्यात आली. मात्र हे सर्व सूड बुद्धीने आणि राजकीय आकसापोटी करण्यात येत असेल तर ते नक्कीच कुठल्याही निकोप लोकशाहीला मान्य नसणार आहे. त्यामुळे पवारांविरोधात करण्यात आलेल्या कारवाई बद्दल मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला आहे.
हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार
महाराष्ट्रा सारख्या राजकीय सुसंस्कृत राज्यात अशा खुन्नसी प्रकारा विरोधात संपूर्ण राज्यभर चीड व्यक्त केली जात आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चा समनवयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई केल्यानंतर पवारांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.