मुंबई- राज्यातील ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अतिवृष्टीमुळे हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमोर मोठे संकट आहे. शेतातील संपूर्ण पीक खराब झाल्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे लवकरात-लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी,अशी मागणी आज विद्यार्थी क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेत राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा-भाजप जिल्हाध्यक्षाच्या 'त्या' वक्तव्याबद्दल उदयनराजेंनी मागितली मुस्लीम बांधवांची माफी
अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्वच पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेले आहे. याबाबत सरकारने व शासनाने कोणतीच भरीव तरतूद शेतकऱ्यांसाठी केली नाही. शासनाकडून वेळेवर कोणते पंचनामे सुद्धा झाले नाहीत. शासनाने केलेल्या दिरंगाई व पीक विमा कंपन्यांनी केलेली फसवणूक यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्या करत आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे जनावरांना चारा नाही, विद्यार्थ्यांना शिक्षण नाही, तरुणांची वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही, याबाबत राज्यपालांनी गांभीर्याने विचार करावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लवकर लक्ष देऊन तत्काळ कारवाईचे आदेश द्यावेत, असे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या मागण्या-
- राज्यात दुष्काळ जाहीर करावा.
- शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्यावी.
- शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये तत्काळ देण्यात यावे.
- जनावरांसाठी चारा छावणी उभारून जनावरांना चारा पुरवण्यात यावा.
- शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची फी सरसकट माफ करावी.
- नव्याने तत्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करावे.
अशा एकूण 14 मागण्या घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शेतकरी व शेतकरी मुलांच्या भवितव्यासाठी निवेदन देण्यात आले. येत्या 25 तारखेला मराठा क्रांती ठोक मोर्चा व विद्यार्थी क्रांती मोर्चा यांची एकत्रित बैठक होणार आहे. यामध्ये राज्यातील विविध भागात जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. सरकारने येत्या आठ दिवसात काम करावे. अन्यथा 25 तारखेनंतर एकत्रित विचार करत मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करणार आहे, असे आबा पाटील यांनी सांगितले.