मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, माजी खासदार व भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या बचावासाठी मराठा क्रांती मोर्चा सरसावली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सामनाचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी लिखाण केले असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात ठोकाठोकीची भाषा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम हेही वाचा-'शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजेंनी द्यावेत'
मुंबई मराठी पत्रकार संघात आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी आव्हाड आणि राऊत यांना गंभीर इशारा दिला आहे. यापुढे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात विधान केल्यास त्यांना महाराष्ट्रात आम्ही ठोकून काढू, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आल्याने त्याविषयी भगवान गोयल या लेखकाच्या विरोधातही मराठा मोर्चाकडून गंभीर इशारा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणीही बरोबरी करू शकत नाही. मात्र, असा प्रकार पुढेही घडत असल्यास त्याची मराठा मोर्चा आपल्या शैलीत दखल घेईल, असे यावेळी कदम यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असे विधान केले होते. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यासाठी साताऱ्यातून परवानगी घ्यायची काय? असे विधान केले होते. त्यावर मराठी क्रांती मोर्चाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत की नाहीत हा विचारण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे विधान करून राऊत आणि आव्हाड हे दोघे मराठा समाजाच्या भावना भडकवत असल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.