मुंबई - मराठा समाजाची सेना भाजप सरकारने फसवणूक केली आहे. मराठा बांधवांचे खच्चिकरण करण्यासाठी १३ हजार ७०० गुन्हे दाखल झाले आहेत. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी जाळपोळ केलेली नाही. आमच्या मागण्या आणखी पण मान्य झालेल्या नाहीत. या मागण्या येत्या निवडणुकांपर्यंत मान्य झाल्या नाहीतर निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालू, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली.
येत्या निवडणूकीत आम्ही भाजप-शिवसेनेला घरात बसविल्या शिवाय राहणार नाही. भाजपा-शिवसेनाला मतदान करू नका, असे 5 कोटी पत्रके मराठा समाज वाटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. शिवसेना खेड्यापाड्यात मराठ्यांच्या जीवावर उभी झाली आहे हे ते विसरलेत. मराठा समाजाशी उद्धटपणे वागणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिवसेना मोठी की मराठा समाज मोठा हे येत्या निवडणुकीत मराठा समाज दाखवून देईल, अशी टीका ठाकरेंवर यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्या विरोधात जो जो उभा राहील आशा सर्व पक्षांना पडण्याचे काम येत्या काळात मराठा समाज करेल, असेही ते म्हणाले.
एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्तिपत्र द्यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी राज्यव्यापी बैठकीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याने आता पुढे काय, याबाबत चर्चा करून रणनीती ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज राज्यव्यापी बैठक घेतली. या वेळी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या समन्वयकांनी सूचना मांडल्या. मोर्चा समन्वयकांनी सांगितले की, मागील अडीच वर्षांत मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले. मात्र, सरकारने २१ पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाबाबत तर घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांविरोधात प्रचार करावा लागेल.
बैठकीत समोर आलेल्या सूचना
- प्रसंगी पुढाऱ्यांना गावबंदी करावी
- अपक्ष मराठा उमेदवारास ताकद द्या
- फितुरांपासून दूर राहा