मुंबई- आरक्षण मिळावे म्हणून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी काल वांद्रे येथे मशाल मोर्चा तर पंढरपूरपासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आज पुन्हा वरळी ते दहिसर असे मराठा आरक्षण जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान मराठा बांधवांमध्ये आरक्षणाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांनी जनजागृती रॅली काढली सामाजिक मागासवर्गातूनच पाहिजे आरक्षण -
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीनुसार भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही व त्यावर स्थगिती आली. मराठा समाजाला सामाजिक मागासवर्ग म्हणून आरक्षण देता येणे शक्य नसल्याचे समोर आल्यावर राज्य सरकारने आर्थिक मागासवर्ग म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, मराठा समाजाच्या नेत्यांनी सामाजिक मागासवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली. यादरम्यान मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात मराठा समजाचे मोर्चे सुरू झाले आहेत. काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. वरळी ते दहिसर रॅली काढली जात आहे. ही रॅली मराठा समाज बांधवांशी संपर्ककरून त्यांच्यामध्ये आरक्षणाबाबत जनजागृती करणार आहे.
अशोक चव्हाणांचा राजीनामा घेऊन काहीही होणार नाही -
अशोक चव्हाण यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशीही एक मागणी समोर येत आहे. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना सर्व बाबींचे ज्ञान आहे. त्यांना हटवून इतर कोणालाही समोर आणले तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेलच असे नाही. मराठा नेत्यांनी तरी गांभीर्याने विचार करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांनी घेतली नवी दिल्लीतील सरकारी वकिलांची भेट