मुंबई - राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता आणखी चार आठवडे ही स्थगिती उठवली जाणार नाही. या विरोधात राज्यातील मराठा समाजात तीव्र संतापाची लाट तयार झाली आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांतर्फे आता पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी महेश डोंगरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
वीस दिवस पायी वाटचाल करणार मोर्चा -
7 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता पंढरपूर येथील विठ्ठलाचे आणि नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मराठा आक्रोश मोर्चा मुंबईकडे निघणार आहे. अकलूज, बारामती, जेजुरी, पुणे मार्गे हा मोर्चा वीस दिवस पायी वाटचाल करत मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. या दरम्यान प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. मराठा आरक्षणाला सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यामुळेच आक्रोश मोर्चा काढून त्यांच्या विरोधात संताप व्यक्त करावा लागत आहे. मराठा समाजाच्या मोर्चात राजकीय पक्षांना सामील करून घेतले जाणार नाही. समाजाचा भाग म्हणून नेते आल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.