मुंबई- आझाद मैदानात मराठा समाजातील तरुणांनी सरकारचा निषेध करत आज मुंडन आंदोलन केले. मराठा आरक्षणाअंतर्गत ३ हजार ५०० तरुणांना नियुक्ती देण्यात यावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी गेल्या ८ दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत. मराठा फक्त राजकारणापुरतेच उरलेत का? असा उद्विग्न सवाल आता आंदोलक करत आहेत.
मागणी मान्य न झाल्यास आणखी आंदोलक दररोज टप्याटप्याने मुंडन करतील, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. मराठा समाजाचे मंत्री आणि आमदार समाजाची बाजू मांडत नाही, असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या एकाही नेत्याने आंदोलकांची अद्याप भेट घेतली नाही.