मुंबईMarath Reservation Formula:सध्या राज्यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी रान उठवलं आहे. सरकारनं त्यांंना आरक्षणाचं आश्वासन दिलंय. पण यासाठी काही मुदत मागितली आहे. मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येनं शांततेच्या मार्गानं मोर्चे निघाले, पण जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील केलेल्या उपोषणावेळी राज्यात विविध भागात हिंसक आंदोलनं करण्यात आलं. यावेळी मराठा समाजानं आक्रमक होत जाळपोळ, तसेच मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यामुळं मराठ्यांनी शांततेत काढलेले मोर्चे आणि आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागलं. (Maratha Reservation Issue)
'या' समाजाला आरक्षणाच्या आंदोलनात अपयश:पंजाब-हरियाणामध्ये जाट समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात जाट समाजानं रस्त्यावर उतरुन आरक्षणाची मागणी केली होता. परंतु, त्यानंतरही या समाजाला आरक्षण मिळालं नाही. यानंतर गुजरातमध्ये देखील पाटीदार आणि गुर्जर समाजानं आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं होतं. आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानं याची दखल तत्कालीन सरकारला घ्यावी लागली होती आणि सरकार अडचणीतसुद्धा आलं होतं. तरी देखील या समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही. दरम्यान, "महाराष्ट्र वगळता इतर राज्यात जाट, पाटीदार, गुर्जर समाजानं आक्रमक आणि हिंसक आंदोलनं केली. मात्र, त्यांना अद्याप आरक्षण मिळालं नाही. महाराष्ट्रात सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं खरोखरंच मराठ्यांना आरक्षण मिळेल का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे", असं आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड म्हणाले.