मुंबई Mumbai Crime News: परदेशात नोकरीस जाण्याची इच्छा असलेल्यांची फसवणूक करण्याच्या हेतूने सिल्व्हर ट्रॅव्हल्स, रॉयल ट्रॅव्हल्स अशा निरनिराळ्या नावाने खार, सांताक्रूझ, गोरेगाव, मीरारोड इत्यादी ठिकाणी कार्यालय थाटून बनावट कागदपत्रांच्या आधारे तरूणांना कुवेत, दुबई आणि सिंगापूर येथील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवून १०० पेक्षा अधिक तरुणांना फसवलं आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल ट्रॅव्हल्स नावाच्या कार्यालयात धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली आहे.
भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :आरोपी शाहिद हुसेन मोहम्मद हुसेन शेख (वय ३९) हा जोगेश्वरी पूर्व येथे राहणारा आहे. आरोपी मोहम्मद नाझीम मोहम्मद शब्बीर मणियार (वय ४४) हा मालाड येथे राहणारा आहे. दोन्ही आरोपी बारावीपर्यंत शिकलेले असून टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्यांची देखील परदेशात नोकरीसाठी जाण्याची इच्छा होती. त्यावेळी त्यांची देखील अशीच फसवणूक झाली होती. त्यानंतर त्यांनी अशाच प्रकारचा गुन्हा २०१६ मध्ये भांडुप परिसरात केला होता. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिलीय.