महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे गोंधळ, मुंबईतील अनेक शाळांमध्ये परीक्षा रद्द - Mumbai school exams canceled

अचानक शालेय शिक्षण विभागाच्या एका परिपत्रकाने परीक्षा घेण्यासंदर्भात गोंधळ निर्माण केला. यामुळे आज अनेक शाळांनी आपल्या नियोजित ऑनलाइन, ऑफलाइन स्वरुपाच्या सर्व परीक्षा तातडीने थांबवल्या आहेत.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय

By

Published : Oct 26, 2020, 9:07 PM IST

मुंबई- कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील शाळांमध्ये अद्यापही ऑनलाइन शिक्षण सुरू असताना यातच शाळांनी परीक्षेचीसुद्धा तयारी करत परीक्षा सुरू केल्या होत्या. मात्र, अचानक शालेय शिक्षण विभागाच्या एका परिपत्रकाने परीक्षा घेण्यासंदर्भात गोंधळ निर्माण केला. यामुळे आज अनेक शाळांनी आपल्या नियोजित ऑनलाइन, ऑफलाइन स्वरुपाच्या सर्व परीक्षा तातडीने थांबवल्या.

ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त कोणतीही परीक्षा घेण्याबाबत शासनाने कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नसताना आज मुंबई आणि परिसरातील अनेक शाळांनी सुरू असलेल्या परीक्षा तात्काळ थांबवल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर, अचानकपणे आज थांबवण्यात आलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना परीक्षा घेऊ नये, अथवा त्या घ्याव्यात, अशा प्रकारचे कोणतेही स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले नाहीत. मात्र, एका शिक्षक संघटनेला दिलेल्या पत्रात परीक्षा घेण्याबाबतचे शासनाचे स्पष्ट निर्देश नाहीत, असा उल्लेख करण्यात आल्याने या उल्लेखाचा गैरअर्थ काढत शिक्षक भारती या संघटनेने परीक्षा रद्द झाल्या आहेत, असा दावा केला आहे. यामुळे आज मुंबई आणि परिसरांमध्ये शाळांनी थेट परीक्षाच थांबवल्या.

या पार्श्वभूमीवर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितले की, आम्ही शिक्षक भारती या संघटनेच्या प्रतिनिधींना शिक्षकांना विनाकारण शाळेत बोलवण्यासासंदर्भात एक पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये शाळा बंद असल्या कारणाने शिक्षकांना ऑनलाइन शिकवण्याचे काम देण्यात आले आहे. अनेक शाळा या आठवड्यातून एकदा, दोनदा सुरू केल्या जातात. यावेळी शाळेत केवळ सहीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना बोलावले जात आहे. त्यात हे शिक्षक हजर न झाल्यास या शिक्षकांची पगार कपात केली जात आहे. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यात मुंबईतील शाळांमध्ये अनेक शिक्षण, कर्मचारी हे ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर आदी परिसरात राहतात. त्यामुळे, या शिक्षकांना प्रवासासाठी प्रचंड मोठ्या अडचणी येतात. यामुळे शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे सुभाष मोरे यांच्याकडून करण्यात आली होती.

ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त कोणत्याही परीक्षा घेण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नाहीत

या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिलेल्या पत्रात ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त कोणत्याही परीक्षा घेण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नाहीत. शिक्षक कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन कर्तव्य काळ गृहीत धरून कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून धरू नये. तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यामुळे, काढण्यात आलेल्या परिपत्रकाचे उल्लंघन झाल्यास मुख्याध्यापकावर जबाबदारी निश्चित करून त्यावर कारवाई केली जाईल, असे निर्देश साबळे यांनी दिले होते. यामुळेच आज मुंबई आणि परिसरातील शाळांनी सर्व परीक्षा थांबवल्या आहेत. शिक्षण विभागाच्या या परिपत्रकामुळे पालक आणि शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-मराठा क्रांती मोर्चाचा वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आक्रोश'

ABOUT THE AUTHOR

...view details