मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात नेण्यात आले. आरोग्य तपासणीत पवार यांना मूत्राशयाचा आजार जडल्याचे निष्पन्न झाले आहे. 31 मार्चला इन्डोस्कोपीनंतर शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, रूग्णालयात दाखल केल्यानंतर केंद्र आणि राज्यातील अनेक नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. स्वत: शरद पवार यांनी याबाबत आपल्या ट्विटवरून माहिती दिली.
यांनी केली पवारांच्या प्रकृतीची विचारपूस -
शरद पवारांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपातील केंद्रीय नेत्यांनी देखील फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गानसाम्राज्ञी लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर, माजी मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आशिष शेलार, कमलनाथ, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे शरद पवारांनी ट्विट करून आभार मानले आहेत.