मुंबई : Mantralaya New Security : मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे. मात्र, आता मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर राज्य सरकार मर्यादा घालणार आहे. त्यासह मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना आता ताटकळत बसावं लागू नये, यासाठी लवकरच ऑनलाईन पास देण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. त्यामुळं मंत्रालयात (Maharashtra Mantralaya) भेट देणाऱ्या नागरिकांना लवकरच ऑनलाईन पास देण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना मंत्रालयातील उपसचिव चेतन निकम यांनी परिपत्रक काढून दिल्या आहेत.
मंत्रालयात भेट देणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा : मंत्रालयात भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड असल्यानं व्यवस्थेवर ताण येत आहे. दररोज मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या तब्बल तीन ते साडेतीन हजार आहे. त्यातही मंत्रिमंडळाची बैठक असल्यास ही संख्या तब्बल 5 हजाराच्या वर जाते. त्यामुळं त्याचा ताण प्रशासनावर आणि मंत्रिमंडळावरही येतो. त्यामुळं ही संख्या मर्यादित करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळं मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात येणार आहे.
नागरिकांना मिळणार ऑनलाईन पास :मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना रांगेत उभं राहून पाससाठी ताटकळावं लागतं. त्यामुळं मंत्रालयाच्या दारासमोर मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना 15 दिवसात ऑनलाईन पास उपलब्ध करुन देण्यात येण्याच्या सूचना मंत्रालय उपसचिवांनी दिल्या आहेत. नागरिकांना लवकरच मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार आहेत.