मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'रेड झोन' असलेल्या मुंबईत आजपासून काही प्रमाणात व्यवहार सुरू करण्यात आली आहे. मात्र राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातच आज कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. जिल्हाबंदी असल्याने तसेच प्रवासासाठी वाहतुकीची साधने नसल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार ग.दी. कुलथे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कुलथे यांनी सांगितलं की, मंत्रालयात काम करणारे बहुतांश कर्मचारी पुणे आणि नाशिक येथील आहेत. राज्यात आजही जिल्हाबंदी कायम आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणाहून मुंबईत येण्यासाठी वाहनांची सोय नाही. सरकारने जिल्हाबंदीचा निर्णय मागे घेऊन प्रवासाची साधने उपलब्ध करून दिली तर ही उपस्थिती वाढू शकते.'
दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला सुरुवात झाली. तेव्हापासून जमावबंदी, संचारबंदी तसेच जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली. मागील अडीच महिन्याच्या काळात मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यामुळे आजही राज्यात जिल्हाबंदी कायम आहे. पण आता सरकारने व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.