मुंबई: सलग लागून मिळालेल्या सुट्ट्या आणि पावसाळी वातावरण यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी आज मंत्रालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी, स्वातंत्र्य दिन आणि पारशी नवीन वर्षानिमित्त सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे, मंत्रालयात सोमवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. मंत्रालयात सोमवारी केवळ २३.८० टक्के कर्मचारी उपस्थिती होती अशी माहिती तंत्रज्ञान विभागातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.
मंत्रालयाकडे फिरवली पाठ :मुंबईतील मंत्री वगळता ग्रामीण भागातील मंत्री शनिवार आणि रविवार आपल्या मतदारसंघात असतात. सोमवार अथवा मंगळवारी ते मंत्रालयात येतात. परंतु मंगळवारी स्वातंत्र्यदिन असल्याने अनेक मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी जायचे असल्यामुळे ते सोमवारी मंत्रालयात आले नाहीत. तर मंत्री उपस्थित राहणार नसल्यामुळे मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही मंत्रालयाकडे पाठ फिरवली होती.
मंत्रालयातील विभागनिहाय उपस्थिती : पर्यावरण २०, गृहनिर्माण २२, वस्त्रोद्योग २३, इतर मागासवर्गीय कल्याण विभाग २७, नियोजन २८, वित्त २९, नगरविकास ३०, सामान्य प्रशासन ३१, वन ३४, गृह ३६, सार्वजनिक बांधकाम ३६, पाणीपुरवठा स्वच्छता विभाग ४५, वैद्यकीय शिक्षण विभागात केवळ चाळीस टक्के कर्मचारी उपस्थित होते,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील तीर्थस्थळी भक्तांची गर्दी : यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तसेच भक्तांची राज्यातील विविध पर्यटन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. या सलग सुट्यांमुळे राज्यातील तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळे गजबजली आहेत. कोल्हापुरात असणाऱ्या अंबाबाई मंदिर परिसरात राज्यासह परराज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच शिर्डीतही भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
हेही वाचा -
- Divyang Kalyan Office : 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला? दिव्यांग कल्याण कार्यालय भाड्यासाठी महिना तब्बल साडेसहा लाख रुपये
- Molestation Case: महिला अधिकाऱ्याचा मंत्रालयातच विनयभंग.. मंत्र्यानी दिले चौकशीचे आदेश
- Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्यांची कशी केली जाते निवड? जाणून घ्या A to Z माहिती