मुंबई - २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना एनआयएने मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक करून चौकशी सुरू केली आहे. मात्र, रविवारी रात्री सचिन वाझेची पुन्हा एकदा तब्येत बिघडल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले.
छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार सचिन वाझेनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. रविवारी रात्री साडे दहा वाजता वाझेला जे जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून पुन्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात आणण्यात आले. आतापर्यंत केलेल्या उपचारांदरम्यान वाझेला मधुमेहाचा त्रास असल्याचे समोर आले आहे.
स्वतःचे बनवले होते सर्च इंजिन आणि मेसेजिंग अॅप -
दरम्यान, सचिन वाझे हा तांत्रिकदृष्ट्या पारंगत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सचिन वाझेने पोलीस खात्यात येण्यापूर्वी स्वतःचे एक मेसेजिंग ॲप बनवले होते. त्याने स्वतःच्या नावाचे सर्च इंजिनही त्याने बनवून घेतल्याचे समोर आले आहे. सचिन वाझेने बनवलेले 'direct baat' हे मेसेजिंग अॅप तो स्वतः वापरत होता. या मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून तो कुठल्या-कुठल्या व्यक्तींच्या संपर्कात होता याचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत आहे. दरम्यान सचिन वाझेचे मेसेजिंग अॅप हे गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे.