मुंबई: मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (३२) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचा 'लिव्ह इन पार्टनर' मनोज साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे तुकडे केले. हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकरमध्ये शिजवले आणि गॅसवर भाजले. नंतर ते तुकडे बकेट आणि टबमध्ये ठेवल्याचे पोलिसांना आढळले.
तिला चार बहिणी :सरस्वती वैद्य हिला आणखी चार बहिणी आहेत. त्यापैकी एकीचे निधन झाले असून उरलेल्या तीन बहिणी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे घेण्यासाठी नया नगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यावेळी नया नगर पोलिसांनी या तिन्ही बहिणींचे जबाब नोंदवले असून त्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशी झाली मनोजसोबत ओळख :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील जानकाबाई आपटे आश्रमात सरस्वती वैद्यसह तिच्या चार बहिणी राहत होत्या. अनाथ आश्रमामध्ये सरस्वती राहात होती. सर्व बहिणी अनाथ आश्रमामध्ये राहायच्या. पाच बहिणींमध्ये सरस्वती धाकटी बहीण होती. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथ आश्रममधून बाहेर पडावे लागते. त्यानुसार पाचही बहिणी आपापल्या मार्गाने बाहेर पडल्या. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर ती बोरिवली येथे राहण्यास आली. नंतर सरस्वती देखील काही वर्षांनी मोठ्या बहिणीकडे राहण्यास आली. त्यानंतर ती जॉब शोधू लागली. अखेर दुकानात नोकरी शोधत असताना एका रेशनिंगच्या दुकानात सरस्वती वैद्य हिची मनोज साने सोबत ओळख झाली.