निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांची प्रतिक्रिया मुंबई :अयोध्येतील संतांनी आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली असतानाच पालघरमध्ये सुरू असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. आता आदिपुरुष चित्रपटाचा वाढता वाद लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मनोज मुंतशीर यांना सुरक्षा पुरवली आहे. द केरला स्टोरी या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर देखील सिनेमाचे निर्माता, दिग्दर्शक आणि स्टारकास्ट यांना सुरक्षा देण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडून असे संरक्षण कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या जीवास धोका असल्यास मिळू शकते. पोलिसांचे संरक्षण मिळवण्यासाठी काय करावे लागते, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
मनोज मुंतशीरच्या जीवाला धोका : मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सॅनन स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटावरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मनोज मुंतशीरने आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. त्यावर मुंबई पोलिसांनी बराच विचारविनिमय केल्यानंतर आता सुरक्षा दिली आहे. मुंबई पोलिसांनी आदिपुरुषचे संवाद (डायलॉग) लेखक मनोज मुंतशीर यांना सुरक्षा पुरवली आहे. एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
पोलीस संरक्षण कसे मिळवायचे : जेव्हा एखाद्या नागरिकाला कोणत्याही व्यक्तीकडून किंवा लोकांच्या समूहाकडून शारीरिक हल्ल्याचा धोका असतो, तेव्हा पोलीस संरक्षणाची मागणी केली जाते अशी माहिती निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. जर तुम्ही परदेशात राहणारे भारतीय नागरिक असाल, तर तुम्हाला संरक्षणात्मक आदेश मिळविण्यासाठी राज्य न्यायालयात जावे लागेल.
या कारणासाठी पोलीस संरक्षण काढून घेता येते : पोलीस संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तीने संरक्षणासाठी तैनात केलेल्या पोलिसांना त्यांच्यासोबत विशिष्ट प्रसंगी किंवा ठिकाणी येण्यास मनाई केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबतची लेखी माहिती पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांना द्यावी, असे गृहखात्याने नमूद केले आहे. असा प्रकार वारंवार झाल्यास त्या व्यक्तीचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात येणार आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
पोलीस संरक्षणाचे शुल्क किती? :पोलीस संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी असले तर त्या व्यक्तीला संरक्षण शुल्क लागू होणार नाही. ज्या व्यक्तीस पोलीस संरक्षण देण्यात आले, त्या व्यक्तीच्या स्थूल उत्पन्नाच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक संरक्षण शुल्क असू नये, असे गृह विभागाने म्हटले आहे. मात्र, संरक्षण शुल्क भरले नाही म्हणून एखाद्याला पोलीस संरक्षण नाकारता येणार नाही. एखाद्याच्या जिवाला धोका असेल तर त्या व्यक्तीचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ज्याला पोलीस संरक्षण देण्याचे निश्चित झाले आहे, त्याच्याकडून तीन महिन्यांच्या संरक्षण शुल्काची रक्कम बँक गॅरंटीच्या स्वरुपात आगाऊ जमा करणे बंधनकारक असते.
पोलिसांची प्रोटेक्शन ब्रांच :निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, व्यक्तिगत पोलीस सुरक्षा मिळवणे महागडी आहे. आदिपुरुष सिनेमा आणि त्याच्याबद्दल पोलीस संरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आल्याचे दिसते. ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ही गरज ठरवत असतं मुंबई पोलिसांची प्रोटेक्शन ब्रांच. मुंबई पोलिसांची जी सुरक्षा शाखा आहे, ती सुरक्षा शाखा प्रोटेक्शन कोणाला द्यायचं हे ठरवत असतं. त्याचप्रमाणे धमकी काय आहे? कोणाकडून आहे? कसल्या प्रकारची आहे? आणि जो व्यक्ती आहे ज्याला धमकी आली आहे. तो कोण किंवा त्याला मारहाण होऊ शकते, त्याला नुकसान होऊ शकते का अशा तीन चार निकषावर निष्कर्ष काढले जातात. त्याला आम्ही म्हणतो थ्रेट पार्सेप्शन वर्क आउट बोलतो. जे पर्सेप्शन आहे त्यावर प्रोटेक्शनची कॅटेगरी ठरली जाते. जनरल कॅटेगरीमधला की व्हीआयपी कॅटेगरीमधला आहे, झेड सेक्युरिटीमधला आहे, की झेड प्लस सेक्युरिटीमधला आहे. या सगळ्या गोष्टी संरक्षणामध्ये आहेत. त्याचप्रमाणे हे प्रायव्हेट व्यक्तीला जर घ्यायचं असेल तर प्रायव्हेट व्यक्तीला त्याप्रमाणे एक आकार, पैसे द्यावे लागतात त्याचे दर सुद्धा ठरलेले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -MLA Geeta Jain : आमदार गीता जैन यांनी मनपा अभियंत्याच्या लगावली कानशिलात, निलंबित करण्यासाठी दिले पत्र