महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानखुर्दमधील भंगार गोदामाची आग ६ तासानंतर आटोक्यात

शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास येथील एका भंगार ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामात केमिकल, ऑईलने भरलेले डबे होते. यातील ५०० ते ६०० डबे आगीनंतर फुटल्याने क्षणात ही आग ५ ते सात हजार चौरस फुटावर पसरली. आजूबाजूच्या गोदामात पसरून भडका उडाला.

भंगार गोदामाची आग ६ तासानंतर आटोक्यात
भंगार गोदामाची आग ६ तासानंतर आटोक्यात

By

Published : Feb 6, 2021, 2:41 AM IST

मुंबई - मानखुर्द मंडाला परिसरातील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. ज्वलनशील साहित्याने भरलेल्या गोदामातील आगीनंतर येथे असलेले केमिकल, ऑईलने भरलेले सुमारे ५०० ते ६०० डबे फुटले त्यामुळे आगीने रौद्र धारण केल्याने आगडोंब उसळला. आगीची तीव्रता वाढून बाजूला असलेली काही गोदामे जळून खाक झाली. अग्निशमन दलाला रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी म्हणजेच तब्बल ६ तास ४० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, आग विझवण्याचे काम अद्याप सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

ऑईलचे डबे फुटल्याने आग पसरली -

मानखुर्द पूर्वेला 'मंडाळा' भागात 'कुर्ला स्क्रॅप' परिसर आहे. याच परिसरातील सुमारे ४ एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे, दुकाने इत्यादी व्यवसायिक स्वरुपाची बांधकामे अनधिकृतपणे उभी राहिली आहेत. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड पासून काही अंतरावर असलेल्या या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनविण्याचे साहित्य, रद्दी, प्लास्टिक असे अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे आहेत. त्यामुळे इथे सातत्याने आग लागण्याचे प्रकार घडत असतात. शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास येथील एका भंगार ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामात केमिकल, ऑईलने भरलेले डबे होते. यातील ५०० ते ६०० डबे आगीनंतर फुटल्याने क्षणात ही आग ५ ते सात हजार चौरस फुटावर पसरली. आजूबाजूच्या गोदामात पसरून भडका उडाला.

अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ वॉटर टँकर, बंबाच्या १६ गाड्य़ांसह घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरु केले. दलाने आग लेव्हल तीनची असल्याचे जाहिर केले. आग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरले. धूराचे लोट वाशीच्या खाडी पुलावरून दिसत होते. या परिसरात दाटीवाटीने गोदामे असल्याने आग वेगाने पसरत गेली. यात गोदामे १५ ते २० गोदामे जळून खाक झाली. आग लागल्यानंतर येथील स्क्रॅप झोपडपट्टीतील, आजूबाजूच्या वसाहतीतील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली.

आधीही लागली होती आग -

या परिसरात भंगाराच्या गोदामांना, झोपडपट्ट्यांना यापूर्वी अनेकवेळा आगी लागल्या आहेत. दीड - दोन वर्षापूर्वी आणि त्यानंतर मागील वर्षी जून महिन्यांत येथील स्क्रॅप झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. जेव्हा आगी लागतात, तेव्हा प्रशासनाला खड़बडून जाग आल्याप्रमाणे कारवाई केली जाते. अनेकवेळा पालिकेने येथील भंगाराचे गोदाम, झोपडपट्टी, दुकानांवर कारवाई केली आहे. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने पुन्हा गोदामे उभी राहून आगी लागत आहेत.

बस मार्ग वळवले -
मानखुर्द मंडाला येथे भंगाराच्या गोदामाला आग लागल्यावर बाजूच्या गोदामांमध्ये आग पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांना ये जा करता यावी यासाठी येथील रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम बेस्टच्या बसेसवरही झाला. छेडानगर, शिवाजी नगर, मानखुर्द, नवी मुंबईत जाणाऱ्या बसेस अमर महाल, चेंबूर नाका, व्हीएन पुरव मार्ग ते महाराष्ट्र नगर या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

एक जवान जखमी -
आग विझवताना अग्निशमन केंद्र प्रमुख हरिश नाडकर (वय ४० वर्षे) हे जखमी झाले. त्यांना जवळच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details