मुंबई :शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाकडून आज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील एनएससीआय येथे शिबिर पार पडणार असून यात नव्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या महिला आमदार मनिषा कायंदे या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीत ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर होत आहे. सकाळपासून पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे. पण अशा मंगलमय दिवशी शिंदे गटाकडून ठाकरेंच्या सेनेला सुरुंग लावण्यात येत आहे. आता विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सायंकाळी त्या प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
20 नगरसेवक शिंदे गटात जाणार : मुंबईतील वरळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आज राज्यव्यापी शिबीर पार पडत आहे. राज्यभरातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला दाखल झाले आहेत. वर्धापनदिनाच्या पूर्वीची तयारी सुरू असतानाच शिंदे गटाकडून ठाकरेंना धक्के दिले जात आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंकडून नगरसेवक गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह जवळपास 20 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असताना विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या ठाकरे गटाला रामराम ठोकणार आहेत.