मुंबई - सर्वसामान्य श्रमिक जनतेला अभिप्रेत असणारा जाहीरनामा श्रमिक जनता परिषदेच्या वतीने डाव्या, आंबेडकरी, पुरोगामी पक्ष संघटनांसमोर मांडण्यात आला. यासाठी जगण्याच्या हक्काचे आंदोलनाच्या वतीने हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा सर्वासमोर मांडण्यासाठी 'श्रमिक जनतेची' जाहीरनामा परिषद दादर येथील शिवाजी मंदीर येथे पार पडली.
या परिषदेमध्ये जनतेच्या मागण्या राजकीय पक्ष प्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या. काँग्रेसकडून प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीकडून नवाब मलिक, भारिप, बसपा समाजवादी, शेकापकडून आमदार धैर्यशील पाटील , माकपचे कॉ. अशोक ढवळे, भाकप या पक्षाचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या जाहीरनाम्यात कष्टकरी, शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी अल्पसंख्य गट, आरोग्य, शेती, पाणी, आरोग्य, अन्नसुरक्षा, शिक्षण यांच्या प्रगतीसाठीचे सामाजिक प्रश्न यात मांडण्यात आले आहे. हा जाहीरनामा बनवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली. तर लोकांसाठी बनवलेला हा जाहीरनामा हा खूप चांगला आहे. आम्ही नक्कीच आमचा जाहीरनामा बनवताना या मागण्या समावेश करण्याचा प्रयत्न करू असे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
या जाहीरनाम्याचे आम्हाला कौतुक आहे. खूप चांगला अभ्यास त्यांनी केला आहे. यातील काही गोष्टीचा अगोदरच आमच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. आमच्या सर्व संघटना या प्रश्नासाठी लढत असल्याची माहिती कॉ. अशोक ढवळे यांनी दिली.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ४३९ सभा घेतल्या. महागाई कमी करणार , असंघटित कामगारांना न्याय देणार, काळा पैसा आणणार, असे सांगितले, पण असं काही झाले नाही, अशी टीकादेखील ढवळे यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांची मांडणी केली. जाणीवपूर्वक युद्धज्वर पेटवण्याचा प्रयत्न करून शेतकरी आत्महत्या, पिकांसाठी हमीभाव, बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान्त्मक संस्थांची होणारी गळचेपी इ. जनतेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे मागे ढकलण्याचा आणि सरकारचे अपयश लपवण्याचा राजकीय प्रयत्न केला जात आहे याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. भाजपच्या जनविरोधी धोरणांचा या परिषदेत निषेध करण्यात आला.