मुंबई :स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. गेल्यावर्षी आजच ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लतादीदींनी या जगाचा निरोप घेतला होता.आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व स्तरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुंबईमध्येसुद्धा लतादीदी यांच्या प्रभू कुंज, पेडर रोड या निवासस्थानापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असणाऱ्या हाजी अली चौक येथे एक ४० फुटांचे शिल्प उभे केले जाणार आहे. स्वरांचा कल्पवृक्ष असे या स्मारकाचे नाव असून एक वेगळ्या व अनोख्या पद्धतीने हे शिल्प साकारले जाणार आहे. रेखा वॉशिंग्टन यांनी या शिल्पाचे डिझाईन केले आहे. मुंबई महानगरपालिका व सरकार यांच्या माध्यमातून येत्या ३ महिन्यांमध्ये हे शिल्प पूर्ण केले जाईल. सर्व विश्वाला लतादीदींच्या स्वरांची भुरळ होती व त्या आजही अजरामर आहेत मुंबईकर जेव्हा या हजेरी या परिसरातून जातील तेव्हा हे शिल्प पाहून लतादीदींच्या स्वरांची पुन्हा त्यांना आठवण होणार आहे धरती ते आकाश पर्यंत लतादीदींच्या स्वरांचा सुरेल संगम होता व तोच संगम हे शिल्प पाहून चहात्यांना आठवणार असल्याचंही मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे.
मुंबई कोस्टल रोडला लतादीदींच नाव द्या :याप्रसंगी बोलताना लतादीदी यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी सांगितले की, आम्हालाही कल्पना नव्हती. फार कमी अवधीत हा कार्यक्रम झाला आहे. वास्तविक स्वरांचा कल्पवृक्ष, हे नाव अतिशय अप्रतिम असे आहे. लतादीदी या स्वरांच्या सप्तसागर होत्या म्हणून हा विशाल असा कल्पवृक्ष असणार आहे. त्या अजरामर आहेत. त्यांचे स्वर नेहमीच चहात्यांना आकर्षित करतील. तसेच मुबंईची नवी ओळख होऊ पाहणाऱ्या कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सुद्धा उषा मंगेशकर यांनी केली केली आहे. वास्तविक ही संपूर्ण कुटुंबीयांची मागणी असल्याचंही त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मोठा प्रकल्प होतो आहे आणि तो आमच्या घराजवळच बनत आहे. त्यामुळे याला दीदींच नाव द्यावे अशी आमची इच्छा आहे. लोढाजी हे या प्रकल्पाच्या कामात सक्रिय आहेत. महानगर पालिकाही आमच्या सोबत आहे. त्यामुळे यास लती दिदींच नावं देण्यात यावे, असे आम्हाला वाटत आहे आणि ते होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.