मुंबई :शहरातील अनेक भागांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या दिसून येतात. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजना अनेक ठिकाणी रखडल्याचे दिसते आहे. या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, तसेच मुंबईच्या प्रकल्पांसाठी आग्रही असल्याची माहिती, पालकमंत्री लोढा यांनी दिली.
झोपडपट्ट्यांची सुधारणा करणार : मुंबईतील झोपडपट्टी वाशी यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यावर आता भर दिला जाणार आहे. झोपडपट्टी भागातील मूलभूत सुविधांबरोबरच रस्ते पाणीपुरवठा सार्वजनिक भूखंडावर खेळाची मैदाने, सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, उद्यानांची निर्मिती आणि अंगणवाड्यांची स्थापना अशा विविध स्तरावर कामे करण्यात येणार आहेत. झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास आणि आरोग्य सुविधांचा विकास इत्यादी प्रकल्प हाती घेण्याचा मानस असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा करण्यासाठी सुमारे 488 कोटी रुपये, झोपडपट्टी वाशी यांचे पुनर्वसन आणि स्थलांतर करणे तसेच संरक्षक भिंतीची कामे करण्यासाठी 115 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपये देण्यात येणार आहे. महिला आणि बालविकासासाठी उपलब्ध असलेल्या तीन टक्के निधीअंतर्गत सुमारे 18 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर नाविन्यपूर्ण योजनेसाठी 27 कोटी रुपये, दलित वस्तीसुधार योजनेसाठी 47 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रत्येक प्रभागात पाच कोटी: झोपडपट्ट्यांमधील रस्ते काँक्रिटीकरण करणे आणि अन्य सुविधा पुरवण्यासाठी प्रत्येक प्रभागातील झोपडपट्ट्यांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील झोपडपट्ट्या या अधिक स्वच्छ आणि सुंदर होतील असा दावा त्यांनी केला आहे.