महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्न समारंभ व्यावसायिकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ, राज्यात १७ जणांची आत्महत्या

कोरोनाकाळात लग्नकार्यास बंदी आल्यानंतर राज्यात १७ जणांनी बेरोजगारीमूळे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, लग्नसमारंभ अशा सर्वच कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

मंडप व्यावसायिक
मंडप व्यावसायिक

By

Published : Feb 26, 2021, 10:06 AM IST

कोल्हापूर/बीड/जळगाव/मुंबई- कोरोनाकाळात लग्नकार्यास बंदी आल्यानंतर राज्यात १७ जणांनी बेरोजगारीमूळे आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी सांगितले की, 'केटरिंग, फ्लॉवर, लाईट, मंडप यासह व्यवसायासंबंधित जिल्ह्यातील ५० हजार पेक्षा जास्त रोजंदारी कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.' याशिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेल्या १७ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. राज्य सरकारने यांचा गांभीर्याने विचार करून अपेक्षित निर्णय घ्यावेत, अशी मागणी सागर चव्हाण यांनी केली.

फुल व्यावसायिकांचा धंदा चौपट

देशात कोरोनाचा वेगाने प्रसार सुरू झाल्यानंतर मार्च मध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, लग्नसमारंभ अशा सर्वच कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. यामुळे उदरनिर्वाहाची सर्वच साधने बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. देशाची आर्थिक स्थिती कोसळत असताना हळूहळू लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. योग्य शारीरिक अंतर, मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करून लग्न समारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांना मर्यादित उपस्थिती, असा नियम ठेवण्यात आला.अनलॉक प्रक्रियेत ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नसभारंभाला परवानगी देण्यात आली. मात्र त्याचा फटका त्या सभारंभावर अवलंबून असलेल्या जवळपास दहा ते बारा व्यवसायांना बसला. वाजंत्री, मंगल कार्यालय चालक, फुल शेती, फुलांचा व्यापार, लाईट, साऊंड, मंडप, केटरिंग, फास्ट फूड, ट्रान्सपोर्ट, फोटोग्राफी, जनरेटर व्यवसायाला याचा फटका बसला. या व्यवसायाशी निगडित असलेल्या जिल्ह्यातील जवळपास ५० हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना व रोजंदारी कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसत उपासमारीची वेळ आली.

लॉकडाऊनने धंदा चौपाट, फुल व्यवसायिकांवर संकट

मंडप, डेकोरेशन व्यावसायिक हतबल

बीड - लग्न समारंभ करण्यासाठी केवळ 50 जणांची उपस्थिती बंधनकारक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याचा फटका लग्न समारंभावर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांना बसला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले. यामध्ये फुल विक्रेते, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक, फोटोग्राफर यांचा धंदा बुडाला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आता जर पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ आली तर सर्वसामान्य नागरिकांची उपासमारी निश्चित आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच छोटे-छोटे व्यावसायिक आता हातघाईला आले असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

बीड येथील रसीद फुल स्मार्टचे प्रमुख रशीद भाई म्हणाले की, 2020 चा मार्च महिन्यामध्ये लग्नसराईच्या तोंडावरच कोरोनाचे संकट आले होते. संपूर्ण वर्षभर आमच्या फुल विक्रीवर विपरीत परिणाम झाला. आता या वर्षी तरी चांगला धंदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र अचानक मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे यंदाची लग्नसराई देखील होईल याची शक्यता नाही.

जळगावमधील व्यवसायिक म्हणाले, ...तर आत्महत्येशिवाय मार्ग नाही!

कोरोनामुळे राज्य सरकारने लग्न सोहळ्यांना फक्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेकांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना फुल विक्रेत्या व्यावसायिक मंगला बारी म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसल्यानंतर यावर्षी आमच्या फुलविक्री व्यवसायाची गाडी आता कुठे रुळावर येत होती. त्यामुळे दिलासा मिळाला होता. परंतु, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि संकट उभे राहिले. राज्य शासनाने लग्न सोहळ्यांवर निर्बंध आणल्याने आमच्याकडे झालेले बुकिंग रद्द होत आहे. अनेक जण आपले पैसे परत घेत आहेत. आम्ही प्रामाणिकपणे बुकिंगचे पैसे परत करत आहोत. कारण आम्हाला पुढेही याच व्यवसायावर पोट भरायचे आहे. कोरोनाची परिस्थिती लवकर निवळली नाही तर आम्ही जगायचे कसे? हा प्रश्न असल्याचे मंगला बारी यांनी सांगितले. मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय करणारे संजय अग्रवाल म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. तरी आम्ही जेमतेम तग धरून राहिलो. यावर्षी परिस्थितीत बदल होईल, असे वाटत होते. पण आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकण्याचे सांगितल्याने सर्वाधिक फटका आमच्या व्यवसायाला बसला आहे. अनेक जण बुकिंग रद्द करत आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते व इतर देणी चुकवायची कशी, हा प्रश्‍न आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल, असे अग्रवाल यांनी सांगितले. लायटिंग डेकोरेटरचे व्यावसायिक जयेश खंदार यांनी सांगितले की, 50 लोकांमध्ये लग्न सोहळे करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयात किंवा थाटामाटात लग्न करण्यास कुणीही तयार नाही. अशा परिस्थितीत आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आम्हाला गोदामाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार देणेही शक्य होत नाही. राज्य शासनाने आमच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून लोकांच्या उपस्थितीची मर्यादा वाढवून दिली पाहिजे, असे खंदार म्हणाले.

मुंबईतील व्यवसायिकांना सतावतोय जगण्याचा प्रश्न

फुल व्यावसायिकांचा धंदा चौपट

मला तर आतापासूनच जगायाच कसं, असा प्रश्न सतावू लागला आहे. कारण या 3 महिन्याच्या कामावर आमचा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, या चार महिन्याचा घर खर्च अवलंबून असतो. मुलाचा शाळेचा खर्च कसा निघणार आता काय करायच हे कळत नाही. जरी मेमध्ये ऑर्डर मिळाल्या तरी त्यात नफा मिळण्याची शक्यता कमीच आहे. मागील वर्षी देखील सर्व नुकसान झाले, यावर्षी काही अशा होत्या मात्र त्या देखील संपुष्टात आल्या आहेत. आता तर हा व्यवसाय बंद करावा, असं वाटायला लागला आहे, असे मुंबईतील डेकोरेटर्स अरुण कातवनकर यांनी सांगितले.

आमच्या अनेक व्यवसायिक मित्रांचे भाड्याने गोडाऊन आहेत त्यांचे भाडे कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्र लिहणार आहोत व लग्न समारंभात अधिक सुरक्षा घेत उपस्थित असणाऱ्या लोकांची संख्या वाढवावी अशी विनंती त्यांना करणार आहोत असे मुंबई डेकोरेटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत कदम यांनी सांगितले.

आता जगण्यासाठी संघर्ष

मी गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात आहे. मात्र एवढा कठीण काळ आमच्यावर आला नव्हता. अनेक ऑर्डर रद्द झाल्या आहेत. एन लग्नसराईच्या सिजनमध्ये आमच्यावर संक्रात आली आहे. लॉक डाऊन मध्ये कोरोनाशी संघर्ष आहोत मात्र आता जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे असे फोटोग्राफर विक्रांत हिरवे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details