मुंबई : विलेपार्ले पूर्व परिसरात असलेल्या थोरात मेडिकल अँड जनरल स्टोअरच्या व्यवस्थापकाने (मॅनेजर) मालकाला जवळपास सव्वादोन लाखांचा चुना लावला. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गौरव कांडवाल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढे अधिक तपास सुरू आहे. तक्रारदार दिनेश थोरात (45) यांनी विलेपार्ले पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मेडिकल शॉपमध्ये काही नियमित ग्राहक होते, ओळखीचे देखील होते. त्यामुळे नियमित ग्राहक काही दिवसांच्या उधारीवर औषधे किंवा अन्य साहित्य घेऊन जायचे. हे ग्राहक उधारीचे पैसे शॉपमध्ये येऊन किंवा होम डिलिव्हरीसाठी त्यांच्या घरी गेले असता रोख रक्कम किंवा ऑनलाईन पेमेंटद्वारे द्यायचे.
40 हजारांचा अपहार केल्याची कबुली :थोरात यांचा गौरववर विश्वास असल्यामुळे ते व्यवहार दररोज पाहत नव्हते. मात्र, ऑगस्ट 2020 मध्ये थोरात यांच्या रोजच्या खरेदी विक्रीमध्ये बरीच तफावत वाढत आहे असे लक्षात आले. त्यामुळे त्यांचा गौरववर संशय वाढू लागला. त्यांनी त्यांचे पार्टनर योगेश यांना या व्यवहारावर लक्ष ठेवायला सांगितले. त्यादरम्यान पैसे कलेक्शनमध्ये 11 मार्चला जवळपास 10 हजार रुपयांचा फरक दिसत होता. तेव्हा तक्रारदार, त्यांच्या पार्टनरने गौरवला याबाबत विचारणा केली. सुरुवातीला गौरवने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, नंतर त्याने 40 हजारांचा अपहार केल्याची कबुली दिली.