मुंबई - वाशी नाका परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या कारणावरून आपल्या दोन्ही मुलांचा गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. दिनेश यादव (30) असे मृत पतीचे नाव असून नेत्रा यादव (3) आणि प्रणय यादव (1) अशी मृत्यू झालेल्या दोन मुलांची नावे आहेत.
पतीने दोन चिमुकल्यांचा गळा दाबून स्वतः केली आत्महत्या चेंबूरच्या कस्तुरबा नगर मॉडेल स्कूलच्या बाजूला वाशी नाका परिसरातील रहिवाशी दिनेश सुरेश यादव वय 30 यांनी बायको प्रियकरा सोबत पळून गेली या विचाराने त्रस्त असतानाच आज(रविवार) सकाळी 8 वाजता आपल्या पोटच्या 2 मुलाचा गळा दाबून स्वतः घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
हेही वाचा - 'एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत'
दिनेशची पत्नी काही दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती. यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करून तिला पुन्हा एकदा दिनेशच्या घरी नांदण्यासाठी घेऊन आले. मात्र, तिच्यामध्ये काही फरक दिसून आला नाही, व ती परत एकदा प्रियकरासोबत पळून गेली. यानंतर दिनेश नैराश्यात होता. दिनेश हा रोजंदारीवर मिळेल ते काम परिसरात करत होता. दिनेश ही निराशेत असल्याने त्याचे दोन्ही मुलं शेजारीच असलेला त्याचा भाऊ नितीन यादव याकडे राहत होती. मात्र, काल(शनिवार) रात्री दिनेश आपल्या दोन्ही मुलांना घरी घेऊन आला. त्यानंतर, दुसऱया दिवशी सकाळी दिनेशचा भाऊ मुलांना बोलण्यासाठी घरी गेला असता, आतून दार बंद होते. खूप वेळ आवाज देवूनही दिनेशने दार न उघडल्याने काही शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले. यावेळी दिनेश हा घरातील पंख्याला फास घेवून लटकलेला आढळला तर, दोन्ही मुले ही निपचित खाली पडून होती.
हेही वाचा - वाडिया रुग्णालयाला महापालिकेकडून 13 कोटींचा निधी
नातेवाईकांनी तत्काळ आरसीएफ पोलीस ठाण्यात फोन करून कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तिनही घाटकोपराच्या राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवले. यावेळी तपासात दोन्ही मुलांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.