मुंबई - टीव्ही वाहिन्यांच्या टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली होती. त्यांना मुंबईतील किल्ला न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींची 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यासंदर्भात विशाल भंडारी (20), शिरीष शेट्टी (44), नारायण शर्मा (47) व बोंपेली राव मिस्त्री अशा चार आरोपींना अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासादरम्यान बोंपेली राव मिस्त्री या आरोपीच्या बँक खात्यामध्ये वर्षभरात एक कोटीहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याचे लक्षात आले आहे. प्रत्येक दोन महिन्यांच्या अंतराने 20 ते 25 लाखांचे ट्रान्झॅक्शन पोलिसांना आरोपीच्या बँक खात्यात आढळलेले आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास केला जात असताना आतापर्यंत 38 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या 38 जणांनी दिलेल्या माहितीत, त्यांना काही निवडक वाहिन्या पाहण्यासाठी सांगितले जात होते. यासाठी त्यांना महिन्याला चारशे ते पाचशे रुपये दिले जात होते. हे पैसे विशाल भंडारी हा गुगल पेच्या माध्यमातून या लोकांना पाठवत होता, असे सांगितले आहे.