मुंबई Player Death due to ball hitting Head : मुंबईतील माटुंगा येथील दादरकर मैदानावर क्रिकेट खेळताना डोक्याला चेंडू लागल्यानं 52 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. क्षेत्ररक्षण करत असताना लगतच्या खेळपट्टीवर सुरू असलेल्या सामन्यातील चेंडू सदर व्यक्तीच्या डोक्याला लागला. यावेळी खेळाडूचा जागीच मृत्यू झालाय. हा खेळाडू दुसऱ्या दिशेला तोंड करुन क्षेत्ररक्षण करत होता. त्यामुळं चेंडू त्याच्या दिशेने येत असल्याची त्याला कल्पना नव्हती. चेंडू लागल्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. यामुळं मुंबईतील क्रिकेटपटूंमध्ये शोककळा पसरलीय.
एकाच मैदानावर सुरु होते दोन सामने : याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, माटुंगा येथील मैदानावर क्रिकेट खेळत असताना भाईंदर येथील जयेश चुन्नीलाल सावला या 52 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला. जयेश सामना खेळत असताना बाजूच्या खेळपट्टीवरही सामना सुरू होता. दोन्ही कच्छी व्हिसा ओसवाल विकास लीजंड कपमध्ये खेळले जात होते. या स्पर्धेत 50 आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी T20 स्पर्धा आहे. मात्र जागा आणि वेळेअभावी एकाच मैदानावर दोन सामने झाले. जयेश खेळत असताना क्षेत्ररक्षण करत होते. तेव्हा एक चेंडू त्यांच्या डोक्याला लागल्यानं ते बेशुद्ध झाले. यानंतर जयेश यांना तातडीनं रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडलीय.